ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले टाकेद बुद्रुक हे छोटेसे सुंदर गाव असुन. टाकेद गावातील अनेक जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहतात या गावाला रामायण कालीन जटायू मंदिरामुळे ऐतिहासिक ओळख असून सर्वतीर्थ या नावाने ओळखले जाते. टाकेद गाव हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे आसपासच्या अनेक वाड्यावस्त्यां वरील लोक या गावात बाजारानिमित्त येत असतात. टाकेद बु. ग्रामपंचायतीला एकूण ४ महसुली गावे आहेत १)टाकेद बु. २)बांबळेवाडी , ३)घोडेवाडी व ४) शिरेवाडी टाकेद बुद्रुक येथील सर्वतीर्थ हे प्रसिद्ध क्षेत्र महाराष्ट्रभर परिचित आहे.त्याचबरोबर टाकेद येथून जवळच्या अंतरावर महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई, विश्रामगड (पट्टा किल्ला) , सिद्ध भैरवनाथ मंदिर, खेड इत्यादी तीर्थक्षेत्र आहे.
- ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे आहे.
- शैक्षणिक संस्था बाबत माहिती :- गावात जिल्हा परिषद शाळेची संख्या : ३ आहेत , ८ अंगणवाड्या , १ आश्रमशाळा व १ माध्यमिक शाळा आहे.
- आरोग्य उपकेंद्र :- टाकेद बु. येथे आरोग्य उपकेंद्र कार्यरत असून तालुका आदिवासी असल्यामुळे आदिवासी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आदिवासी व इतर नागरिकांना आरोग्य उपकेंद्रातून सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. कोविड कालावधीत उत्तम सेवा व लसीकरण करण्यात आले. तसेच गरोदर माता व बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.
- पाणीपुरवठा :- टाकेद बु. व महसुली गावे बांबळेवाडी, घोडेवाडी व शिरेवाडी येथे पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो.
- घंटागाडी :- गावातील ओला-सुका कचरा ग्रामपंचायतच्या घंटागाडी मार्फत उचलला जातो. घंटागाडी घरोघरी जाऊन कचरा संकलन करते.
- हगणदारी मुक्त गाव :- "घर तिथे शौचालय" या संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्माण करून गाव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.
- भूमिगत गटार :- शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.
- अंगणवाडी :- टाकेद बु., बांबळेवाडी, घोडेवाडी व शिरेवाडी येथे एकूण ८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. पाणी, वीज सुविधा असून डिजिटल शिक्षणाची प्राथमिक सुरुवात दिली जाते.
- पशू वैद्यकीय दवाखाना :- गावात पशू वैद्यकीय दवाखाना कार्यरत असून पशुपालकांसाठी योग्य मार्गदर्शन केले जाते.
- माध्यमिक शाळा :- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद बु. व महर्षी वाल्मिकी आश्रम शाळा या दोन्ही शाळांमधून उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. विविध शैक्षणिक उपक्रमही राबविले जातात.
- सभागृह :- आमदार व खासदार निधीतून सामाजिक सभागृह उभारण्यात आले असून ते ग्रामस्थांना मोफत उपलब्ध करून दिले जाते.
- यात्रा महोत्सव :- दरवर्षी सर्वतीर्थ टाकेद बु. येथे महाशिवरात्री निमित्त ३ दिवसांची यात्रा भरते. येथे मनकामेश्वर महादेव मंदिर असून लाखो भाविक उपस्थित राहतात.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक योजना :- या योजनेंतर्गत हायमास्ट लाईट, काँक्रीट रस्ते आणि बंदिस्त गटारीसारख्या सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.

आदेश्वर जैन श्वेतांबर मंदिर
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टाकेद बुद्रुक या छोट्याशा गावात जैन समाजाचे श्री आदिनाथ भगवान हे प्रथम तीर्थकार यांची ६५० वर्ष प्राचीन अशी प्रतिमा असलेले जैन मंदिर आहे पूर्वी या गावात जैन समाज होता पण हळूहळू हा समाज शहराकडे स्थलांतरित झाल्यामुळे आदेश्वर भगवान यांची मूर्ती ही २० कि.मी. वर असणाऱ्या घोटी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला पण असे करताना ही मूर्ती जागेची हालली नाही. जैन समाजाचे धर्मगुरू यांनी ही मूर्ती टाकेद मध्येच ठेवून तेथे मोठे मंदिर बांधावे असे आज्ञा देण्यात आली. सुरुवातीचे मंदिर लाकडाचे होते नंतर ते पाडून छोटेसे कळस असलेले मंदिर बांधण्यात आले. आणि मार्च १९९४ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला व मोठे मंदिर बांधण्यात आले. हा प्रतिष्ठेचा कार्यक्रम अतिशय मोठा होता पंचक्रोशीतून अनेक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हे मंदिर आतून संपूर्ण काचेचे सजवलेले आहे या मंदिरात दूरवरचे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा तसेच भोजनालयाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सर्वतीर्थ
टाकेद येथे प्रभू रामचंद्रांनी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील टाकेद तीर्थ होय. येथे पक्षीरूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला. इथेच जटायूच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी त्याचे अंत्यसंस्कार केले व आपल्या पित्याचे व जटायूचे श्राद्ध तर्पण केले. याच ठिकाणी लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा आखली होती असे म्हणतात.‘लक्ष्मण रेखा’ या नावाचे एकमेव मंदिर नाशिक येथील पंचवटी येथे आहे. नाशिकपासून इगतपुरी घोटीमार्गे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. रामायणातील जटायूमुळे टाकेद तीर्थ पावन झाले. नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण. तिथे उभारलेली जटायूची मोठी मूर्ती अतिशय आकर्षक असून एक देखणे मंदिरही उभारले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वतीर्थ टाकेद या स्थानाचे अतिशय आकर्षक पर्यटन केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. जटायूची भव्य मूर्ती हे इथले प्रमुख आकर्षण असून ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. इथेच वसले आहे टाकेद तीर्थ. भंडारदरा इथूनसुद्धा हे अंतर ४५ किलोमीटर इतके आहे. हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असल्याने वर्षभर असंख्य पर्यटक या स्थानाला भेट देतात.
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |